सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या आणि रिन्यूएबल पॉवर क्षेत्रातील अराजकता*
काही दिवसांपूर्वी मस्सा जोग,ता.केज जि.बीड येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घृण हत्येमुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे.ही घटना अतिशय संतापजनक व निषेधार्ह आहे.संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी असणारे गुन्हेगार व त्यांच्या मागील खरे सूत्रधार पकडले गेले पाहिजे व त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.

केज प्रतिनिधी सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या आणि रिन्यूएबल पॉवर क्षेत्रातील अराजकता*
काही दिवसांपूर्वी मस्सा जोग,ता.केज जि.बीड येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घृण हत्येमुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे.ही घटना अतिशय संतापजनक व निषेधार्ह आहे.संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी असणारे गुन्हेगार व त्यांच्या मागील खरे सूत्रधार पकडले गेले पाहिजे व त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.
या प्रकरणांमध्ये वरवर जरी काही गोष्टी समोर आल्या असतील तरी या घटनेच्या मुळाशी गेल्यास पवन ऊर्जा, सौर ऊर्जेच्या क्षेत्रातील नवीन प्रकल्पांशी संबंधित अनेक गंभीर बाबी उजेडात येतील.संतोष देशमुख यांच्या अतिशय भयावह हत्येमागची पूर्ण पार्श्वभूमी समजून घेता ही एक महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी घटना तर आहेच शिवाय रिन्यूएबल पॉवर क्षेत्रात भविष्यातील गुंतवणुकीसाठी भीतीदायक असे वातावरण निर्माण करणारी घटना आहे.या हत्येमागे जातीय द्वेशाची मानसिकता असल्याचे आरोप होत आहेत,हे आरोप चुकीचे आहेत असं लगेचच म्हणता येणार नाही मात्र त्याच बरोबर ग्रामीण भागातील औद्योगिक विकासाच्या मार्गातील गुंडांचा हस्तक्षेप,त्याला मिळणारा राजकीय वरदहस्त या बाबीही समोर आणायला हव्यात.अन्यथा ग्रामीण भागात आलेले अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प गुंडाळले जातील व नव्याने असे प्रकल्प आणण्यास कोणीही धजावणार नाही.
सोलापूर, बीड आणि धाराशिव ह्या तीन जिल्ह्यांमध्ये मागील तीन ते चार वर्षापासून भारतातील नव्हे तर परदेशातील अनेक नामांकित रिन्यूएबल एनर्जी, विंडमिल(पवनचक्क्या) आणि सोलर पावर ( सौर ऊर्जा )कंपन्या अतिशय अनुकूल आणि सुयोग्य वातावरण असल्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये गुंतवणूक करून मोठे मोठे प्रोजेक्ट्स सुरू करीत आहेत.
या सर्व भागात रिन्यू पॉवर, टाटा, स्टरलाईट, अवाडा, टोरंट पॉवर, इ. यांसारख्या अनेक नामांकित कंपन्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर मोठमोठे पवनचक्की आणि सौर ऊर्जेचे प्रकल्प उभे केले आहेत. परंतु मागील काही वर्षांमध्ये या सर्व गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय हस्तक्षेप,स्थानिक गुंडागर्दी, दहशत, खंडणी बहाद्दर आणि वसुलीखोर लोकांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. या भागातील काही लोकप्रतिनिधी आर्थिक लाभ आणि स्वार्थ साधण्यासाठी जातीयतेचं विष पसरवून हत्यारे, दहशत-गुंडागर्दी करणाऱ्यांना पाठीशी घालत असतील तर हे किती समाजविघातक आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातून ही बाब आता चव्हाट्यावर आली आहे.
अनेक शेतकऱ्यांनी आपल्या परिसरामध्ये चांगले प्रोजेक्ट्स येत आहेत, भविष्यामध्ये या सर्वांमुळे सुबत्ता येईल, आपल्या मुलाबाळांचे भले होईल, अनेक नोकऱ्या निर्माण होतील या आशेने या कंपन्यांना सपोर्ट करून जमीनी उपलब्ध करून दिल्या. परंतु त्यानंतर काही समाजकंटक आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी यात शिरकाव करीत काही शेतकऱ्यांना फितवून, त्यांचे माथे भडकावून या कंपन्यांविरुद्ध लढण्यास सुरुवात केली. त्याद्वारे अनाठाई आणि अतिशय अयोग्य प्रमाणामध्ये आवाच्या सव्वा मोबदला, वेगवेगळ्या स्वहिताच्या मागण्या पुढे करून अडवणूक करण्यास सुरुवात केली.आपल्या उद्योगाची आर्थिक हानी नको म्हणून काही कंपन्या किंवा त्यांचे अधिकारी अशा गुंडांच्या हातीही लागल्या. अशाप्रकारे ह्या तथाकथित गुंडांनी खंडणी द्वारे शेतकऱ्यांना, आणि कंपन्यांनाही अगदी सळो की पळो करून सोडले आहे. मग त्यासाठी चालू असलेले कंपनीचे काम अडवणे, कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आणि ठेकेदारांना जबर मारहाण करणे, खोटी आंदोलने करणे, आणि कंपनीविरुद्ध द्वेष पसरवणे या प्रकारचे उपद्व्याप चालू केले.कंपनीने प्रोजेक्टसाठी जी काही बजेटची तरतूद केली त्यापेक्षाही त्यांना तीन तीन, चार चार पट जर बजेट जास्त जात असेल तर कंपनीसाठी हे काम पूर्ण करणे अगदी अशक्य गोष्ट आहे. परंतु कंपन्यानी आधीच काही गुंतवणूक करून अर्धवट कामे केल्यामुळे कंपनीला कामही सोडता येत नाही आणि पूर्णही करता येत नाही अश्या दृष्ट चक्रामध्ये हे उद्योग अडकले आहेत.
या सर्व गोष्टींवरती जर नजर टाकली तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते कि या तात्कालिक थोड्याशा पैशाच्या मोहापाई हे हापापलेले मूठभर लोक या भागातील सर्वसामान्य जनतेचे भविष्यच अंध:कारात टाकत नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्रालाच विकासाच्या गंगेपासून मागे खेचत आहेत.
या सर्व त्रासामुळे काही महिन्यापूर्वी रिन्यू पावर या नामंकित कंपनीने आपल्या जवळपास 40 ते 50 पवनचक्क्या सर्व मटेरियल सहित येथून दुसऱ्या राज्यामध्ये हलवल्या आहेत.आणि जर असेच प्रकार चालू राहिले तर संपूर्ण प्रोजेक्ट्स इथून जायला वेळ लागणार नाही. ही गोष्ट महाराष्ट्रासाठी नाचक्की करणारी आणि अतिशय हानिकारक आहे.
एकीकडे आपण गतिमान आणि वेगवान महाराष्ट्राच्या गोष्टी करतो आणि त्याच महाराष्ट्रामधून दहशत आणि गुंडागर्दीमुळे अशी गुंतवणूक जर बाहेर जात असेल तर त्यासाठी जबाबदार कोण? अशा बाबतीत उठसूठ सरकारवर खापर फोडून चालणार नाही तर यासाठी समाजातूनच ही कीड संपवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे आणि सरकारने या प्रयत्नांना पूरक वातावरण निर्माण केले पाहिजे.
आत्ताच संसदेमध्ये असं जाहीर केले गेले आहे की पुढील भविष्यामध्ये पॉवर आणि रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात साधारणतः दहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक देशांमध्ये होणार आहे आणि जर ह्या प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्रात घडत असतील तर त्यातील एकही रुपया महाराष्ट्रात न येण्याचा धोका संभवत नाही का?
ही एक अत्यंत धोकादायक सूचना आहे.यावर जर वेळेवर पावले उचलले गेले नाहीत आणि शेतकरी व स्थानिकांना न्याय देतानाच योग्य ते प्रकारे गुंतवणुकीला समर्थन आणि संरक्षण दिले नाही तर महाराष्ट्राची राखरांगोळी व्हायला वेळ लागणार नाही. या क्षेत्रातील माहितगार मंडळींशी चर्चा केल्यास भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये या प्रकारची कामे झाली आहेत परंतु जितका त्रास इकडे काही भागात दिला जातोय, असे वातावरण किंवा या प्रकारची अडवणूक कुठेही पाहावयास मिळत नाही अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. ही मान खाली घालायला लावणारी बाब आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येच्या पार्श्वभूमीवर हे सांगावं लागतंय कारण संतोष देशमुख यांसारखे काही कार्यकर्ते, काही लोक आहेत त्यांना या क्षेत्रातलं चांगलं वाईट कळलेलं होतं.आपल्या गावाचं, भागाचं हित कशात आहे हे यांनी जाणले होते.आपल्या भागातील जनतेचा विकास करायचा असेल तर या प्रकल्पांना सहकार्य झालं पाहिजे, हे प्रकल्प या भागात कसे प्रस्थापित होतील यासाठी मदत केली पाहिजे या प्रामाणिक भावनेने संतोष देशमुख यांसारखे काही कार्यकर्ते काम करत होते.अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांना खंडणीखोर, हप्तेखोरांनी ज्या पद्धतीने संपवण्याचा चंग बांधला आहे तो या भागासाठीच नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी धोकादायक आहे.
सरकारने सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची पाळंमूळ खणून काढावीत, दोषींना कठोर शासन तर करावेच.शिवाय या घटनेने पवन ऊर्जा,सौर ऊर्जा प्रकल्पांच्या क्षेत्रात जी अराजकता,अनागोंदी माजली आहे, या क्षेत्रात गुंडांनी जो हैदोस घातला आहे त्याचा कायमचा बिमोड केला पाहिजे. या निमित्ताने जातीयतेची झालर पांघरून हत्यारे, खंडणीखोर,गुंडांना पाठबळ देणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही लगाम लावावा लागेल.याबाबतीत ताबडतोब महत्त्वाची पावले उचलून या गोष्टीवर परिणामकारक उपाययोजना करणे आवश्यक आहे. आवश्यकता भासल्यास या सर्व समस्यांवर चर्चा करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञ लोकांना एकत्र बोलवून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले गेले पाहिजे आणि त्यानुसार त्यावर योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे,तरच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातून काहीतरी बोध घेतल्यासारखे होईल.
लेखक–
संजीव भोर पाटील,
प्रवक्ता शिवसेना.
मो.8182837979