शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष एडवोकेट अजितदादा काळे यांच्या दणक्यामुळे नेवासा तालुक्यातील 2022 चा विमा शुक्रवार दि 13/09/2024 पर्यंत जमा होणार .
पिक विमा कंपनीकडून नेवासा तालुक्यातील सुमारे ४०,८०,४६३ रुपये मात्र एवढी रक्कम एन इ एफ टी बाउन्स झालेली होती मिळवून देण्यास अखेर शेतकरी संघटनेला यश.. अजित काळे साहेब
नेवासा ( प्रतिनिधी )खरिप 2022/2023 मधील पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत अनेक शेतकरी पात्र असतांना देखील वंचित होते . याबद्दल सविस्तर माहिती अशी कि एच डी एफ सी अग्रो प्रा . लि या इन्शुरन्स कंपनीने नेवासा तालुक्यातील सुमारे 40,80,463 रु . मात्र एवढी रक्कम एन इ एफ टी बाऊन्स झालेली होती . तसेच 1000 रु च्या खाली 1,59,849 अशी एकूण 42,40,312 रु एन ई एफ टी बाऊन्स झालेली होती . त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी तहसिल आणि कृषी कार्यालयात खेटा मारल्या . त्यातील काही शेतकऱ्यांनी एच डि एफ सी अग्रो लि . ह्या इन्शुरन्स कंपनी ला देखील संपर्क साधला . परंतु सर्वांनी उडवाउडवीची उत्तरे देत दुर्लक्ष केले .
वास्तविक पणे शेतकऱ्यांच्या बचत खात्यामध्ये विमा रक्कम आणून देणे हि कृषि अधिकारी, तहसिलदार आणि इन्शुरन्स कंपनी चे अधिकारी यांची जबाबदारी असते . या त्रिसुत्री समितीचे अध्यक्ष तहसिलदार असतात . कोणत्याही शेतकऱ्याची बचत खात्यात विमा रक्कम येण्यास काही तांत्रिक अडचण असल्यास ती दूर करणे या समितीची जबाबदारी असते . परंतु सदर जबाबदारी झटकून शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसली .
हि गंभीर बाब शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष एडवोकेट अजितदादा काळे यांच्याकडे शेतकरी खबरनामा ऑफिस , नेवासा येथील जनता दरबारात घेवून आले . त्यानंतर नेवासा तालुका शेतकरी संघटनेने मागोवा घेण्यास सुरुवात केली . या प्रकरणामध्ये संपूर्णपणे दप्तर दिरंगाई झाल्याचे लक्षात आले . त्या नंतर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे ,जिल्हा उपाध्यक्ष श्री हरि अप्पा तुवर आणि युवाध्यक्ष डॉ रोहीत कुलकर्णी यांचेकडे पाचेगांव ,ता नेवासा येथील श्री अजित किसन तुवर यांनी त्यांची व्यथा मांडली . श्री अजित तुवर ह्यांच्या बचत खात्यावर पैसे मिळालेले नव्हते परंतु कंपनी कडून ते पैसे दिल्याचे सांगण्यात येत होते . अनेक वेळा मागोवा घेवून या प्रकरणाचा उलगडा होत नव्हता . अखेरीस एडवोकेट अजितदादा काळे यांच्या आदेशानुसार 4 जानेवारी 2024 रोजी अहमदनगर जिल्हा पोलीस अधिक्षक यांना हि बाब कळवून सदर कंपनी , तहसिलदार व कृषि अधिकारी यांचे वर गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली . तरि देखील पोलीस खात्याकडून सरकारी अधिकाऱ्यांना वाचविण्याच्या नादात वेळकाढू भूमिका घेण्यात आली . अखेरीस शेतकरी संघटनेने 10 सप्टेबर 2024 रोजी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले . त्यानंतर एडवोकेट अजितदादा काळे यांनी पोलीस स्टेशन सह सर्व सरकारी अधिका-यांना कायदेशीर भाषा सुनावली व सर्व व्यवस्था खडबडून जागी झाली . त्या नंतर स्वतः एडवोकेट अजितदादा काळे यांनी अहमदनगर येथील एच डि एफ सी अग्रो लि . च्या कार्यालयात धाव घेतल्याव शुक्रवार दि13/09/2024 पर्यंत वंचित शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याचे कंपनीने मान्य केले आहे . तरि देखील जो पर्यंत शेतकऱ्यांचे पैसे बचत खात्यात प्राप्त होत नाही तोपर्यंत उपोषण चालू ठेवण्याचा नेवासा तालुका शेतकरी संघटनेने निर्धार केला आहे . तसेच सदर विमा भरपाई आश्वासित वेळेत न आल्यास तहसिल कार्यालय कुलुप ठोकून बंद करणार आहेत .
या निर्णयामुळे नेवासा तालुक्यातील पंचक्रोशीतील शेतकरी सुखावलेला असून नेवासा तालुका शेतकरी संघटनेचे अभिनंदन होत आहे . तसेच ह्या यशानंतर खरिप 2023/2024 च्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिं . च्या बाबतीत देखील याच प्रकारे कठोर भुमिका घेणार असल्याचे एडवोकेट अजित दादा काळे यांनी सांगितले .
या कामी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री अनिलराव औताडे , जिल्हा उपाध्यक्ष श्री हरि अप्पा तुवर , तालुकाध्यक्ष मेजर अशोक काळे, युवाध्यक्ष डॉ . रोहीत कुलकर्णी , तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब नागोडे , संपर्क व प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र पा . काळे , श्री अजित तुवर, एडवोकेट बाळासाहेब कावळे , श्री किरण दादा लंघे, श्री विश्वासराव मते, कैलास पाटील पवार ज्येष्ठठ मार्गदर्शक व त्याचबरोबर दत्तू पाटील निकम पुरुषोत्तम सर्ज , दादासाहेब नाबदे, सुधाकर देशमुख, शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक बाबासाहेब खराडे, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष ज्योती ताई शेंडे माजी संचालक अनिलराव मते, अहमदनगर जिल्हा संघटक श्रीी भास्कर तुवर सुरेगाव गंगा महेश शिंदे सरपंच व कायदेशीर सल्लागार अवताडे पाटील त्यांचे ग्रामस्थ हेही उपस्थित होते सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रमुख भुमिका बजावली अनेक संघटनेने यावेळी पाठिंबा नोंदवला केळी उत्पादक संघटना मराठा समाज संघटना, धनगर समाज संघटना समर्पण फाउंडेशन शेतकरी संघटना शरद जोशी मंच इत्यादी संघटनेने पाठिंबा दिला शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन व आभार
खालील प्रमाणे विमा कंपनीचा ईमेल द्वारे लेखी आश्वासन प्राप्त झाले!!
प्रिय महोदय,
चर्चा केल्याप्रमाणे, आम्ही तुमच्यासोबत NEFT शेतकरी यादी आधीच शेअर केली आहे. अनेक प्रयत्न करूनही, चुकीच्या बँक तपशीलांमुळे आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात दावे जमा करू शकलो नाही. तथापि, आमच्या चर्चेनुसार, तुम्ही बँक खात्यांना आधार सीडिंग पूर्ण केले आहे.
आम्ही शुक्रवारपर्यंत आधार-आधारित पेमेंट प्रक्रियेचा पुन्हा प्रयत्न करू. NCIP पोर्टलद्वारे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आम्ही यशस्वी आणि अयशस्वी पेमेंटची यादी सामायिक करू. कोणतीही अयशस्वी देयके असल्यास, आम्हाला खाते तपशील अद्यतनित करावे लागतील आणि प्रक्रिया पुन्हा करावी लागेल.
सादर,
बाळासाहेब गोपाळ
HDFC ERGO जनरल इन्शुरन्स कंपनी लि