शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वेळप्रसंगी मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढणार – रघुनाथदादा पाटील यांचा इशारा
शेतकरीविरोधी जाचक कायदे रद्द करावेत, माहिती अधिकाराचा कायदा सक्षमपणे राबवावा, सहकारी संस्थांची लूट थांबवावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी वेळप्रसंगी सहकार मंत्र्यांसह इतर मंत्र्यांच्या घरासमोरही मोर्चा काढण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते र

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वेळप्रसंगी मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढणार – रघुनाथदादा पाटील यांचा इशारा
प्रतिनिधी, कराड | शेतकरीविरोधी जाचक कायदे रद्द करावेत, माहिती अधिकाराचा कायदा सक्षमपणे राबवावा, सहकारी संस्थांची लूट थांबवावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी वेळप्रसंगी सहकार मंत्र्यांसह इतर मंत्र्यांच्या घरा समोरही मोर्चा काढण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला.
कराड येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. शेतकरी संघटनेचे क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, राजेंद्र बोंड-पाटील, राजेंद्र मोहिते, अशोक पाटील, उत्तम खवळे आणि इतर नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
रघुनाथदादा पाटील म्हणाले, “की क्रांतीसिंह नाना पाटील यांचं स्वप्न साकार करण्यासाठी जिल्हास्तरीय संवाद दौरे आणि लढ्याचे काळ येणार असून त्यासाठी शेतकऱ्यांनी सज्ज राहावे.”
बैठकीत शेतकऱ्यांनी पाण्यापासून वंचित राहिलेल्या भागांतील समस्या मांडल्या. त्यावर उपाय सुचवित रघुनाथदादा यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाचा हिशोब लक्षात घेऊन हमीभाव मिळाला पाहिजे. शेती उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क मिळावा, जिल्हा बँकेच्या संचालक निवडणुकीत सेवा सहकारी संस्थांमधून शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळावा.
शेती उत्पन्न असणाऱ्या गावांना ‘दुष्काळग्रस्त‘ घोषित करून, पीककर्ज, वीजबिल, विजेचे खांब, रोहित्र, वीजवाहिनी यावर सरकारने खर्च करावा आणि गावात पाणी योजना राबवाव्यात, अशीही त्यांनी मागणी केली.
सरकारकडून दुर्लक्ष झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा रघुनाथदादा पाटील यांनी बैठकीत दिला.