अशोकच्या संचालक मंडळावर कारवाई करा; शेतकरी संघटनेची मागणी.. तालुकाध्यक्ष युवराज जगताप;
अशोक कारखान्याने इतर कारखान्यांना ऊस दिलेल्या उसाचे अशोकला १७ कोटी ९७ लाख ८२ हजार रुपयांचे येणे आहे.तसेच इकडून तिकडे उसाची ने-आण केल्यामुळे तोडणी-वाहतूक खर्चात प्रचंड वाढ झाल्याचा शेराही लेखा परीक्षण अहवालात लेखापरीक्षकांनी मारलेला आहे

अशोकच्या संचालक मंडळावर कारवाई करा;
शेतकरी संघटनेची मागणी;
इतर करखान्यांकडून १८ कोटींचे येणे बाकी
श्रीरामपूर (प्रतिनिधी)-
अशोक कारखान्याने इतर कारखान्यांना ऊस दिलेल्या उसाचे अशोकला १७ कोटी ९७ लाख ८२ हजार रुपयांचे येणे आहे.तसेच इकडून तिकडे उसाची ने-आण केल्यामुळे तोडणी-वाहतूक खर्चात प्रचंड वाढ झाल्याचा शेराही लेखा परीक्षण अहवालात लेखापरीक्षकांनी मारलेला आहे.परिणामी अशोक कारखान्याच्या सभासदांना अपेक्षित ऊस भाव मिळत नाही.वरील सर्व निर्णय प्रक्रियेला कारखान्याचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक व संचालक मंडळ हे जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे व तालुकाध्यक्ष युवराज जगताप यांनी साखर आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले की,गेल्या अनेक वर्षापासुन अशोक सह. साखर कारखाना गाळप क्षमतेपेक्षा जास्त ऊसाच्या नोंदी घेऊन कार्यक्षेत्राबाहेरील ऊसाचे अगोदर गाळप करणे, सभासदांचा ऊस उशिरा गाळप करणे, गाळप क्षमतेपेक्षा जास्त ऊसाच्या नोंदी घेतलेल्या ऊसाचा पुरवठा अशोक कारखान्यामार्फत इतर कारखान्यांना पुरविणे, कार्यक्षेत्रातील ऊस इतर कारखान्यांना देणे व कार्यक्षेत्राचे बाहेरील ऊस अशोक कारखान्यात आणुन गाळप करणे असे निर्णय घेत आहे.यामूळे तोडणी वाहतुक खर्चात वाढ झाल्याचे दरवर्षी वैधानिक लेखापरिक्षण अहवालात लेखापरिक्षकाने शेरे मारले आहेत. सन २०२३-२४ च्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालात पान नं. १०५ इतर साखर कारखान्यांकडील ऊस विक्री पोटी येणे बाकी १७ कोटी ९७ लाख ८२ हजार रुपये इतकी दर्शविले आहे. वरील केलेल्या सर्व व्यवहाराचा परिणाम सभासदांना मिळणा-या ऊस दरावर होऊन येणेबाकी मूळे कारखान्याच्या कर्जात वाढ दिसत आहे. सन २०२०-२१ ते २०२३-२४ पर्यंत ऊस पुरवठा इतर कारखान्यांना दिल्याची माहिती वैधानिक लेखापरिक्षण अहवालातून पूढे आली आहे.
वरील सर्व व्यवहारास कारखान्याचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक व संचालक मंडळ हे जबाबदार आहेत. त्यामुळे यांचेवरती योग्य ती कार्यवाही करावी.तसेच एफ.आर.पी. कायदानूसार १४ दिवसांचे आत ऊसाचे पेमेंट न केल्याने अशोक कारखाना व आपले कार्यालया कडे वेळोवेळी तक्रारी करूनदेखील एफ. आर. पी. वरील व्याज कारखान्याने दिलेले नाही. वैधानिक लेखापरीक्षण अहवालातही कारखान्याने एफ.आर.पी. वरील व्याजाची तरतूद केलेली नाही असा लेखापरीक्षकांनी शेरा मारला आहे.तरी एफ.आर.पी. वरील व्याज सभासद शेतक-यांना लवकरात लवकर मिळणेसाठी आपले कार्यालयाने कार्यवाही अशी मागणीही या निवेदनात शेवटी करण्यात आली आहे. या
निवेदनाच्या प्रति साखर आयुक्त कार्यालय,प्रादेशिक सहसंचालक कार्यालय यांना देण्यात आल्या आहेत.