माया धोटे यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित
शेतकरी हितासाठीची सातत्यपूर्ण धडपड, कृषी क्षेत्रातील योगदान व सामाजिक बांधिलकीची दखल


माया धोटे यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित
शेतकरी हितासाठीची सातत्यपूर्ण धडपड, कृषी क्षेत्रातील योगदान व सामाजिक बांधिलकीची दखल
जळगाव | प्रतिनिधी
कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, शेतकरी हितासाठी केलेली सातत्यपूर्ण धडपड तसेच सामाजिक बांधिलकी जपत राबवलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत करंजा (लाड) येथील जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या विदर्भ विभागीय अध्यक्षा माया धोटे यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
जळगाव येथे आयोजित भव्य समारंभात, मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय कृषक समाजाच्या वतीने देण्यात येणारा हा मानाचा पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व कवयित्री बहिणाबाई चौधरी सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्राचे पहिले कृषिमंत्री, शेतकरी चळवळीचे प्रणेते आणि कृषी शिक्षणाचे जनक डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार यंदाच्या वर्षी माया धोटे यांना मिळाल्याने संपूर्ण परिसरात समाधान व अभिमानाची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास कृषी, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, महिला कार्यकर्त्या तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह तसेच शाल-श्रीफळ देऊन माया धोटे यांचा यथोचित गौरव करण्यात आला.

पुरस्कार स्वीकारताना माया धोटे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की,
“हा सन्मान मी संपूर्ण शेतकरी वर्गाला अर्पण करत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि सातत्याने कार्य करत राहण्याची प्रेरणा या पुरस्कारामुळे मिळाली आहे.”
यावेळी उपस्थित मान्यवरांनी माया धोटे यांनी कृषी क्षेत्रात व शेतकरी प्रश्नांवर केलेले कार्य आजही प्रेरणादायी असून, त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
दरम्यान, जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर तसेच संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने माया धोटे यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
— जळगाव जिल्हा प्रतिनिधी
खबरनामा न्यूज




