बातमी : श्रीरामपूर जिल्हा आणि देवळाली तालुका होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना साकडे
मागील चव्वेचाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या श्रीरामपूर जिल्हा निर्मितीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. या जिल्ह्यात देवळाली-श्रीशिवाजीनगर तालुक्याचा समावेश झाल्यास दुर्लक्षित 32 गावांना न्याय मिळेल, असा विश्वास श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी व्यक्त केला आहे.

📰 बातमी : श्रीरामपूर जिल्हा आणि देवळाली तालुका होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना साकडे
देवळाली, प्रतिनिधी — मागील चव्वेचाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या श्रीरामपूर जिल्हा निर्मितीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. या जिल्ह्यात देवळाली-श्रीशिवाजीनगर तालुक्याचा समावेश झाल्यास दुर्लक्षित 32 गावांना न्याय मिळेल, असा विश्वास श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी व्यक्त केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन लांडगे यांनी श्रीरामपूर जिल्हा आणि नव्या देवळाली-श्रीशिवाजीनगर तालुक्यासाठी साकडे घातले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य अजित कदम, भास्कर कोळसे, प्रा. अरविंद सांगळे, शामकांत खडके, महेश औटी, अनिस पठाण, योगेश सिनारे, मयूर कदम, संतोष धनवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
राजेंद्र लांडगे यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितले की, “आज अहिल्यानगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ गोवा राज्यापेक्षा पाच पट आणि दिल्ली राज्यापेक्षा अकरा पट मोठे असून, अशा अवस्थेत आपत्कालीन सेवा व प्रशासनावर ताण येतो. त्यामुळे निकषाच्या आधारे सर्वात कमी खर्चात तयार होणारा जिल्हा म्हणजे श्रीरामपूर, असे स्पष्ट होते.”
ते पुढे म्हणाले की, “राहुरी तालुक्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील 32 गावांची गैरसोय थांबविण्यासाठी देवळाली-श्रीशिवाजीनगर तालुका होणे आवश्यक आहे. देवळाली-प्रवरा नगर परिषदेची स्थापना 1982 मध्ये झाली असून आजपर्यंत तालुका न झाल्याने या भागात कोणतेही उद्योगधंदे आले नाहीत. परिणामी येथील जनतेला घरपट्टी, पाणी पट्टीसारख्या करांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.”
श्रीरामपूर जिल्हा आणि देवळाली तालुका निर्माण झाल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधी, विकासाची गती आणि प्रशासनाची सोई मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शेवटी, “अतिव्यस्ततेतूनही दादांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला, यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये उत्साहाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे,” असे राजेंद्र लांडगे यांनी नमूद केले.
✍️ बातमीसाठी सादरकर्ता:
नरेंद्र पाटील काळे
‘खबरनामा न्यूज’, नेवासा – अहिल्यानगर
📞 संपर्क: 9730457007




