बेकायदेशीर भारनियमन बंद करा; अन्यथा कार्यालय बंद करू!
महावितरणला आंदोलनाचा इशारा

बेकायदेशीर भारनियमन बंद करा; अन्यथा कार्यालय बंद करू!
महावितरणला आंदोलनाचा इशारा
शिरजगाव | प्रतिनिधी
मुळा-प्रवराच्या कार्यक्षेत्रातील महावितरणच्या श्रीरामपूर उपविभागाअंतर्गत गेल्या चार महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररीत्या भारनियमन करण्यात येत असल्याचा आरोप करत अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या भारनियमनाचा सर्वाधिक फटका वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना व शेती क्षेत्राला बसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे व तालुकाध्यक्ष युवराज जगताप यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने श्रीरामपूर उपविभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र रजपूत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
गांधीगिरीतून उपरोधिक सत्कार
निवेदन देताना शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंत्यांचा कंदील, शाल, टोपी व नारळ देऊन गांधीजींच्या मार्गाने उपरोधिक सत्कार केला. तसेच मागण्या मान्य न झाल्यास किंवा त्याबाबत लेखी आश्वासन न मिळाल्यास “नेताजींच्या मार्गाने आंदोलन करू”, असा स्पष्ट इशारा दिला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्क
सुमारे दीड तास झालेल्या चर्चेदरम्यान कार्यकारी अभियंता राजेंद्र रजपूत यांनी भारनियमनाचा विषय त्यांच्या अधिकारक्षेत्रात येत नसल्याचे सांगितले. यावर जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी अहिल्यानगर जिल्हा वीज वितरण कंपनीचे मुख्य अधीक्षक अभियंता श्री. पवार यांच्याशी थेट दूरध्वनीवर संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी आजपासून शेतीसाठी आठ तास थ्री-फेज वीजपुरवठा आणि पूर्वीप्रमाणे वाड्या-वस्त्यांवरील शेतकरी नागरिकांसाठी सिंगल फेज वीजपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले.

निवेदनातील प्रमुख मागण्या
शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामपूर उपविभागाच्या शेजारील वैजापूर,
, अहिल्यानगर व संगमनेर तालुक्यांमध्ये कुठल्याही प्रकारचे भारनियमन केले जात नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या माध्यमातून शेती क्षेत्राच्या नावाखाली ४८ हजार कोटी रुपये वीज वितरण कंपनीला अदा केल्याचे प्रसिद्धी माध्यमांतून सांगितले आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या वीजबिलाचा भार उचलत असताना वीज वितरण कंपनीने पूर्ण दाबाने २४ तास वीजपुरवठा करणे बंधनकारक आहे.

मात्र, मागील तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांना शेतीसाठी फक्त सहा तास वीजपुरवठा केला जात आहे. एप्रिल-मे महिन्यात ४२ ते ४४ अंश तापमानात पिकांना पाणी देता आले नाही. जून-जुलैमध्येही हीच परिस्थिती कायम आहे. वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना सिंगल फेज वीजदेखील मिळत नसल्याने वन्यप्राण्यांच्या धोक्यात अंधारात राहावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना अभ्यासासाठी वीज उपलब्ध होत नाही. बहुतांश शेतकऱ्यांकडे संकरित गाईंचे गोठे असून दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीनचा वापर करावा लागतो. वीज नसल्यामुळे अनेक तरुण दुग्ध उत्पादकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सरकारने शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केले; मात्र अप्रत्यक्षपणे शेतीची वीजच गायब केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ऊर्जा विभागाकडून हजारो कोटी रुपये दिले जात असताना दुसरीकडे शेतकऱ्यांना वीजच मिळत नाही. भारनियमनाच्या नावाखाली मोठा घोटाळा होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या गंभीर प्रश्नावर कोणतेही आमदार किंवा खासदार बोलत नसल्याची बाबही चिंताजनक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
देखभालीकडेही दुर्लक्ष
जळालेले रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) वेळेत बदलले जात नाहीत. मुळा-प्रवरा कार्यक्षेत्रातील जुने विद्युत स्ट्रक्चर, पोल, कंडक्टर तसेच विजवाहक तारांवरील झाडे, झुडपे व वेली यांची छाटणी केली जात नाही. ट्रान्सफॉर्मरचे केबल, ऑईल व कट-आऊट यांच्या देखभालीकडेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. श्रीरामपूर उपविभागासाठी आवश्यक साहित्य खरेदी केले जात नाही का? किंवा खरेदी केलेले साहित्य नेमके कोठे जाते? असा गंभीर प्रश्नही संघटनेने उपस्थित केला आहे.
२८ जुलैला कार्यालय बंद आंदोलन
मुख्य कार्यकारी अभियंत्यांनी तातडीने दखल घेऊन पूर्वीप्रमाणे सुरळीत वीजपुरवठा सुरू करावा तसेच देखभाल-दुरुस्तीची सर्व कामे तक्रार आल्यानंतर तात्काळ पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा महावितरणच्या मुख्य कार्यालयावर काढून कार्यालय बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिष्टमंडळाने दिला.
उपस्थित
यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप, सतीश नाईक, संतोष भालदंड, बाळासाहेब जाधव, सर्जेराव देवकर, शिवाजी दांगट, संजय वमने, शैलेश वमने, गोकुळ भालदंड, समीर रोकडे, वसंत भालदंड, रावसाहेब गलांडे, गोरक्षनाथ आढाव, सतीश गायकवाड, गणेश कापसे, दिनेश कापसे, संजय नाईक, मंज्याबापू गलांडे, सुनील नाईक, दिगंबर औताडे, नानासाहेब बहिरट, इंद्रभान चोरमल, साहेबराव चोरमल, शिवाजी काळे आदी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.




