दिव्यांग विद्यार्थ्यांकडून पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश
रेणुकादेवी विद्यालयात उत्साहात वृक्षारोपण; 'एक विद्यार्थी – एक वृक्ष' संकल्पातून वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारली

दिव्यांग विद्यार्थ्यांकडून पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश
रेणुकादेवी विद्यालयात उत्साहात वृक्षारोपण; ‘एक विद्यार्थी – एक वृक्ष’ संकल्पातून वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारली
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष श्री प्रमोद (दादा) मोरे यांचे मार्गदर्शन; पर्यावरण संवर्धन, परिसर स्वच्छता व प्लास्टिकमुक्तीचा दिला संदेश

पिंपळगाव पिसा | प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रेणुकादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळगाव पिसा येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण वातावरणात वृक्षारोपण करून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला. “एक विद्यार्थी – एक वृक्ष” हा संदेश देत विद्यार्थ्यांनी वृक्षलागवडीसह त्यांच्या संगोपनाचीही जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प केला.
या वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष श्री प्रमोद (दादा) मोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी श्री प्रमोद (दादा) मोरे यांनी उपस्थितांना वृक्षसंवर्धन, पर्यावरण संवर्धन, परिसर स्वच्छता आणि प्लास्टिकमुक्ती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून, आज लावलेले प्रत्येक झाड भविष्यातील पिढ्यांसाठी अमूल्य ठरणार असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
यावेळी मान्यवरांनी वृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे मनापासून कौतुक केले. कोणत्याही परिस्थितीत समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडण्याची प्रेरणा या विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून दिली, असे गौरवोद्गार उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन केंद्रस्तरीय विशेष शिक्षक श्री भानुदास शिंदे सर यांनी केले. शिंदे सर दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी करून समावेशित शिक्षणाला खऱ्या अर्थाने न्याय देत आहेत. त्यांच्या या कार्याचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. यावेळी श्री बापू जगताप, पा. विनायक जगताप, श्री नंदकुमार पंधरकर व अनिल पंधरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब मुठे यांच्यासह वीर मॅडम, भापकर एस. ए., शिंदे पी. एस., गायकवाड सर, मांडगे बी. एम., ननवरे डी. एल., उबाळे एस. एस., गोरे एस. बी., मडके बी. बी. आणि मेंगवडे मॅडम यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी लावलेल्या वृक्षांचे नियमित संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त केला. विद्यालयाच्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच सामाजिक संवेदनशीलतेचा संदेशही प्रभावीपणे पोहोचला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.




