Breaking
ई-पेपरदेवगड किसनगिरी बाबा संस्थान नेवासादेवगड देवस्थान गुरुवर्य भास्करगिरी महाराजनेवासानेवासा प्रेस क्लबनेवासा विधानसभा आमदार विठ्ठलरावजी लंघे साहेबपंढरपूरपोलीस स्टेशन नेवासाब्रेकिंगमहाराष्ट्रवारकरी संप्रदाय वार्तावारकरी सांप्रदायशेतकरीश्री संत ज्ञानेश्वर देवस्थान नेवासा पालखी सोहळा

शासनमान्यतेनंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याला भव्य प्रारंभ

नेवासेत पहिला रिंगण सोहळा भक्तिरसात; हजारो वारकऱ्यांच्या नामघोषाने अवघे शहर दुमदुमले

0 6 9 0 6 2

शासनमान्यतेनंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याला भव्य प्रारंभ

 

नेवासेत पहिला रिंगण सोहळा भक्तिरसात; हजारो वारकऱ्यांच्या नामघोषाने अवघे शहर दुमदुमले

 

नेवासा (प्रतिनिधी): संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या श्रीक्षेत्र नेवासा येथून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पायी पालखी दिंडीचे बुधवारी (दि. ८ जुलै) दुपारी पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. शासनाची अधिकृत मान्यता मिळाल्यानंतरचा हा पहिलाच पालखी सोहळा असल्याने यंदाचा सोहळा ऐतिहासिक ठरला. सुमारे तीस दिंड्यांसह हजारो वारकरी “ज्ञानोबा माऊली तुकाराम”च्या अखंड नामघोषात सहभागी झाले. नेवासा एसटी स्थानक परिसरात पालखी सोहळ्यातील पहिला रिंगण सोहळा उत्साह, भक्ती आणि जल्लोषात पार पडला.

दिंडीचे नेतृत्व ज्ञानेश्वर मंदिराचे देविदास महाराज म्हस्के, ह.भ.प. रामभाऊ राऊत आणि राम महाराज झिंजुरके यांनी केले. प्रस्थानापूर्वी माऊलींच्या पादुका तसेच पैस खांबाचे पूजन भास्करगिरीजी महाराज, उद्धवजी महाराज, ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज, देविदास महाराज म्हस्के, रमेशानंदगिरीजी महाराज, ऋषिनाथजी महाराज, ज्ञानेश्वरजी महाराज आदींच्या हस्ते मंत्रोच्चार आणि जयघोषात संपन्न झाले.

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातून पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. पालखी रथास जोडण्यात आलेल्या मानाच्या बैलांचे तसेच मानाच्या अश्वाचे पूजन करण्यात आले. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील, रत्नमालाताई लंघे-पाटील, देवस्थानचे अध्यक्ष तथा माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी आमदार नरेंद्र घुले-पाटील, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, शंकरराव लोखंडे, शिवसेनेचे युवा नेते प्रभाकरराव शिंदे, उदयनदादा गडाख-पाटील, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, डॉ. क्षितिज घुले, नंदकुमार पाटील, अॅड. संजय सुखदान यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पालखी रथातील पादुकांचे पूजन करण्यात आले.

 

दिंडीच्या अग्रभागी भागवत धर्माची पताका, त्यामागे डोक्यावर तुळशी कलश घेतलेल्या महिला, भजनी मंडळे, टाळ-मृदुंगाच्या गजरात चालणारे वारकरी आणि पुष्पांनी सजविलेल्या चांदीच्या रथात विराजमान माऊलींच्या पादुका, असे दिमाखदार दृश्य पाहावयास मिळाले. रथाच्या पुढे मानाच्या दोन दिंड्या, तर मागे शिस्तबद्ध पद्धतीने इतर दिंड्या मार्गक्रमण करीत होत्या. दिंडीने नेवासा शहराला प्रदक्षिणा घालत भक्तिमय वातावरण निर्माण केले.

प्रदक्षिणा मार्गावर विविध चौकांत फटाक्यांची आतषबाजी, तोफांची सलामी, आकर्षक रांगोळ्या आणि पुष्पवृष्टी करून पालखीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. नंदकुमार खरात महाराज, उद्धव महाराज नेवासकर आणि अंकुश महाराज जगताप यांनी पालखीचे स्वागत केले. नगरपंचायत चौकात स्वर्गीय राजेंद्र मापारी मित्र मंडळाच्या वतीने जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली, तर नगरसेवक स्वप्नील मापारी यांनी संतांचा सत्कार केला. महाराष्ट्र बँक चौकात मुथा मेडिकलच्या मुथा परिवाराच्या वतीने वारकरी भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले.

नेवासा एसटी स्थानक परिसरात राज्यातील दुसरा आणि या पालखी सोहळ्यातील पहिला रिंगण सोहळा भक्तिभावात पार पडला. अश्व रिंगण, झेंडा रिंगण, टाळ-मृदुंग रिंगण तसेच महिला भजनी मंडळांचे रिंगण “ज्ञानोबा माऊली तुकाराम”च्या जयघोषात रंगले. नेवासा आगाराच्या वतीने आगार व्यवस्थापक प्रशांत होले तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पालखीचे पूजन केले.

याच ठिकाणी नेवासा प्रेस क्लब व पत्रकारांच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. तसेच देविदास महाराज म्हस्के यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी भगवान शास्त्री जंगले, नंदकिशोर महाराज खरात, कृष्णा हारदे, ज्ञानेश्वर माऊली शिंदे, ज्ञानेश्वर महाराज हजारे, लक्ष्मीनारायण जोंधळे, राम महाराज भोगे यांच्यासह वारकरी संप्रदायातील महाराज, हजारो वारकरी, महिला-पुरुष भाविक आणि नेवासेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्यसनमुक्तीचा संदेश देणारी दिंडी ठरली विशेष आकर्षण

 

नेवासा पोलीस निरीक्षक दराडे यांच्या संकल्पनेतून आणि प्रसिद्ध चित्रकार भरतकुमार उदावंत तसेच सत्यजित उदावंत यांच्या कलाकृतीतून यंदाच्या पालखी सोहळ्यात व्यसनमुक्ती जनजागृतीची विशेष दिंडी सहभागी झाली. व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश देणारे आकर्षक फलक चित्रकार भरतकुमार उदावंत यांनी साकारले होते. हे फलक हातात घेऊन वारकरी, महिला भजनी मंडळे, महाराज मंडळी तसेच भाविकांनी व्यसनमुक्तीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला. विशेष म्हणजे आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील, पोलीस निरीक्षक दराडे आणि विविध मान्यवरांनीही हे फलक हातात घेऊन व्यसनमुक्ती अभियानाला सक्रिय पाठिंबा दर्शविला. त्यामुळे पालखी सोहळ्याबरोबरच समाजप्रबोधनाचा प्रभावी संदेशही जनमानसात पोहोचला.

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 9 0 6 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे