🔴 खबरनामा ब्रेकिंग: जलजीवन मिशनमधील गैरव्यवहार भोवला! दोन कार्यकारी अभियंत्यांसह चौघे निलंबित
जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांमध्ये प्रचंड अनियमितता आणि निकृष्ट दर्जा आढळून आल्याने प्रशासनाने मोठी कारवाई


🔴 खबरनामा ब्रेकिंग: जलजीवन मिशनमधील गैरव्यवहार भोवला! दोन कार्यकारी अभियंत्यांसह चौघे निलंबित
अहिल्यानगर:
जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांमध्ये प्रचंड अनियमितता आणि निकृष्ट दर्जा आढळून आल्याने प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्याप्रकरणी दोन कार्यकारी अभियंत्यांसह एकूण चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळबळ उडाली आहे.
निलंबित झालेल्या अधिकाऱ्यांची नावे:
१. एस. आर. वारे (तत्कालीन कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, संगमनेर उपविभाग)
२. जी. एस. भोगावडे (कार्यकारी अभियंता, अहिल्यानगर)
३. एस. एस. दहिफळे (उपअभियंता, नेवासे उपविभाग)
४. एम. पी. धगधगे (तत्कालीन उपअभियंता)
नेमके प्रकरण काय?
अहिल्यानगर जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेमार्फत जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना राबवण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्या होत्या. कोट्यवधी रुपये खर्च होऊनही बहुतांश योजनांतून लोकांना पाणीच मिळाले नाही.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती स्थापन केली होती. समितीच्या प्राथमिक पाहणीत कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचे आणि गंभीर त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले. चौकशीत कोणतीही बाधा येऊ नये म्हणून या चारही बड्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे
श्री संभाजी माळवदे यांनी जिल्ह्यातील ११२ गावांमधील पाणी पुरवठा योजनांच्या कामांबाबत थेट उपमुख्यमंत्र्यांकडे पुराव्यांसह तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीनंतर नेवासे उपविभागातील पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी-तिसगाव, भगवानगड परिसर, भेंडे-कुकाणे, सोनई-करजगाव, राहुरी तालुक्यातील वरवंडी आणि अहिल्यानगर तालुक्यातील गुंडेगाव यांसह अनेक प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांच्या कामांची गुप्त चौकशी करण्यात आली. यात पाण्याच्या टाक्या, पाईपलाईन यांसह सर्वच कामे बोगस झाल्याचे उघड झाले.
💥 खबरनामा इम्पॅक्ट: ‘खबरनामा’च्या दणक्याला यश!
अहिल्यानगर जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या या कोट्यवधींच्या घोटाळ्याची बातमी ‘खबरनामा न्यूज’ने सर्वात प्रथम लावून हा संपूर्ण गैरव्यवहार चव्हाट्यावर आणला होता.
श्री. संभाजी माळवादे यांनी या घोटाळ्याचा सखोल अभ्यास करून, ग्राऊंड लेव्हलवरून संपूर्ण माहिती आणि पुरावे शोधून काढले. त्यांनी ही सर्व खळबळजनक माहिती ‘खबरनामा’च्या संपादकांकडे सुपूर्द केली होती. त्यानंतर ‘खबरनामा’ने या वृत्ताचा सातत्याने पाठपुरावा करून प्रशासनाला जाब विचारला. अखेर या वृत्ताची गंभीर दखल घेतली जाऊन चार वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निलंबन झाले असून, हा ‘खबरनामा न्यूज’च्या दणक्याचा आणि सातत्यपूर्ण पत्रकारितेचा मोठा विजय मानला जात आहे!
मोठी कारवाई, मात्र गोपनीयता कायम!
प्रशासनाने ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने केली आहे. चार अधिकाऱ्यांना निलंबित केले असले तरी अद्यापही या संदर्भातील सविस्तर तपशील जाहीर न करता गुप्तता पाळली जात आहे.
जिल्हा परिषद अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?
या प्रकरणात केवळ जीवन प्राधिकरणाच्या दोन-चार अधिकाऱ्यांवर कारवाई न करता, जिल्हा परिषद स्तरावरील तांत्रिक व प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप असल्याने त्यांच्यावरही कडक कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या घोटाळ्याचे धागेदोरे आणखी कुठपर्यंत जातात, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
- ब्युरो रिपोर्ट, खबरनामा न्यूज नेटवर्क.




