Breaking
ई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालगुणवंतांचा सत्कारनेवासाब्रेकिंगवाकडीवाकडी रामनवमी उत्सव आणि कथावारकरी संप्रदाय वार्तास्नेह मेळावा

खबरनामा न्यूज चैतन्यच्या प्रथम वाढदिवसानिमित्त वाकडीत भक्तिरसाची मेजवानी

स्वामी अमृतानंदजी माताजींनी नामदेव महाराजांच्या अभंगातून दिला सदाचार, नम्रता आणि संतसंगाचा संदेश

0 6 5 3 8 8

खबरनामा न्यूज

चैतन्यच्या प्रथम वाढदिवसानिमित्त वाकडीत भक्तिरसाची मेजवानी

स्वामी अमृतानंदजी माताजींनी नामदेव महाराजांच्या अभंगातून दिला सदाचार, नम्रता आणि संतसंगाचा संदेश

वाकडी प्रतिनिधी :

ह.भ.प. गणेश महाराज काळे व त्यांच्या धर्मपत्नी दीक्षा काळे यांच्या चिरंजीव चैतन्य यांच्या प्रथम वाढदिवसानिमित्त वाकडी येथील राम मंदिर प्रांगणात आयोजित कीर्तनसेवा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. या प्रसंगी स्वामी अमृतानंदजी माताजी यांनी आपल्या सुस्राव्य वाणीतील कीर्तनातून संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या अभंगाचे अत्यंत समर्पक निरूपण करत उपस्थितांना जीवनमूल्यांचा संदेश दिला.

 

माताजींनी कीर्तनात घेतलेला अभंग –

> “आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा ।

हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ।।

ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा ।

माझिया विष्णुदासा भाविकासी ।।

नामा म्हणे तया असावे कल्याण ।

ज्यामुखी निधान पांडुरंग ।।”

या अभंगाचे निरूपण करताना माताजी म्हणाल्या की, “आकल्प आयुष्य व्हावे” म्हणजे केवळ दीर्घायुष्य नव्हे, तर आयुष्यभर सद्गुण, सेवा आणि भक्तीचा मार्ग कायम राहावा, अशी संतांची भावना आहे. “तया कुळा माझिया सकळा” या शब्दांत संपूर्ण समाज आणि मानवजातीच्या कल्याणाची व्यापक भावना दडलेली आहे.

“हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो” याचा अर्थ स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, खरा भक्त हा स्वार्थ, मत्सर, संशय आणि नकारात्मक विचारांपासून दूर असतो. मनातील चुकीच्या कल्पना आणि अहंकार दूर झाले की भक्ती अधिक दृढ होते.

“ही संत मंडळी सुखी असो” या ओवीतून संतांनी समाजातील सज्जन, सत्प्रवृत्तीच्या आणि सेवाभावी लोकांच्या सुखाची प्रार्थना केली आहे. तरअहंकाराचा वारा न लागो” या शब्दांचे स्पष्टीकरण करताना माताजींनी अनेक दृष्टांत देत सांगितले की, ज्ञान, संपत्ती किंवा पद मिळाल्यानंतरही नम्रता टिकवणारा माणूसच खऱ्या अर्थाने मोठा असतो.

“माझिया विष्णुदासा भाविकासी” या ओळीत भक्तीचा मार्ग स्वीकारणाऱ्या प्रत्येक भाविकावर ईश्वराची कृपा राहावी, अशी संत नामदेवांची प्रार्थना असल्याचे त्यांनी सांगितले.

अभंगातील शेवटची ओळ “नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग” याचा अर्थ उलगडताना माताजी म्हणाल्या की, ज्या व्यक्तीच्या मुखात सतत ईश्वराचे नाम आहे, ज्याच्या आचरणात भक्ती आहे, त्याचे आणि त्याच्या परिवाराचे कल्याण निश्चित होते. पांडुरंगाचे नाम हेच जीवनातील सर्वात मोठे धन असल्याचा संदेश नामदेव महाराजांनी या अभंगातून दिला आहे.

कीर्तनादरम्यान माताजींनी अनेक समर्पक उदाहरणे, दृष्टांत आणि संतचरित्रातील प्रसंग सांगत अभंगातील प्रत्येक ओवी श्रोत्यांना सहज समजेल अशा भाषेत उलगडून सांगितली. त्यामुळे उपस्थित भाविक विशेषतः महिला वर्ग मंत्रमुग्ध होऊन कीर्तनाचा आस्वाद घेत होता.

यावेळी भजनी मंडळांनी हरिनामाचा गजर, अभंग आणि भजने सादर केली. वाढदिवसानिमित्त अन्नदानाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. उपस्थितांनी चैतन्यला प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रार्थना केली.

कार्यक्रमातील आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे वाकडी येथील संतोष कराळे यांच्या कन्येचे संस्कृत श्लोक पठण. स्वामी अमृतानंदजी माताजी यांच्या वेदांत गुरुकुल आश्रम येथे शिक्षण घेणाऱ्या अवघ्या दहा वर्षांच्या या बालिकेने सुंदर उच्चार आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

याप्रसंगी स्वामी अमृतानंदजी माताजी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. गणेश महाराज काळे व त्यांच्या धर्मपत्नी दीक्षा काळे यांनी संतपूजन केले. सुखदेव काळे गुरुजी यांनी माताजींच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास भाऊसाहेब पाटील भगत, बंडू उर्फ तुकाराम गायकवाड, रामनाथ टेलर, कराळे परिवार, गायकवाड परिवार, काळे परिवार, जाधव परिवार यांच्यासह गावातील अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि भाविक उपस्थित होते. विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

शेवटी ह.भ.प. गणेश महाराज काळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. संतसाहित्य, नामस्मरण, अन्नदान आणि संस्कार यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा सोहळा उपस्थितांच्या मनात कायम स्मरणात राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

खबरनामा न्यूज, वाकडी

3/5 - (2 votes)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 5 3 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे