लिंबागणेश–बोरखेड वाहून गेलेल्या पुलाची पावसाळ्यापूर्वीच दुरुस्ती
दुग्धाभिषेक आंदोलनाची दखल; २० लाखांच्या निधीतून पूर्ण झाले काम – ग्रामस्थांच्या एकजुटीच्या लढ्याला यश, डॉ. गणेश ढवळे यांचा दावा

लिंबागणेश–बोरखेड वाहून गेलेल्या पुलाची पावसाळ्यापूर्वीच दुरुस्ती
दुग्धाभिषेक आंदोलनाची दखल; २० लाखांच्या निधीतून पूर्ण झाले काम – ग्रामस्थांच्या एकजुटीच्या लढ्याला यश, डॉ. गणेश ढवळे यांचा दावा
लिंबागणेश | प्रतिनिधी
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड तालुक्यातील लिंबागणेश ते बोरखेड या महत्त्वाच्या मार्गावरील रस्ता खचून नळकांडी पूल वाहून गेला होता. त्यामुळे वाणी वस्ती, घोलप वस्ती, गावडे वस्ती, ढवळे वस्ती, घरत वस्ती, मुळे वस्ती यांसह परिसरातील शेकडो ग्रामस्थांचा संपर्क तुटला होता. दुग्ध उत्पादक शेतकरी, भाजीपाला उत्पादक, विद्यार्थी तसेच बाजारपेठेत ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

घटनेनंतर जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेटी देत पाहणी केली. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. केवळ आश्वासने आणि फोटोसेशन यापलीकडे कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

अखेर सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत लक्षवेधी आंदोलन छेडले. “दादा, आता तरी पावाल का?” असा सवाल करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
या आंदोलनाची गंभीर दखल घेत तत्कालीन पालकमंत्री अजितदादा पवार यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्ते, पूल, तलाव आणि बंधाऱ्यांच्या तातडीने दुरुस्तीचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिल्याची माहिती समोर आली. त्यानंतर जिल्हा वार्षिक योजना (ग्रामीण रस्ते विकास योजना) सन २०२५-२६ अंतर्गत २० लाख रुपयांचा निधी लिंबागणेश–बोरखेड रस्ता व नळकांडी पुलाच्या दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आला.
या निधीबाबत जिल्हा परिषद बीड, बांधकाम विभाग क्रमांक १ यांनी मंजुरीचे लेखी पत्र आंदोलनकर्ते डॉ. गणेश ढवळे यांना दिले होते. त्यानुसार युद्धपातळीवर काम पूर्ण करण्यात आले असून पावसाळ्यापूर्वीच रस्ता आणि नळकांडी पुलाची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून रखडलेला ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे.
काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार, जिल्हा प्रशासन आणि संबंधित बांधकाम विभागाचे आभार मानले. तसेच लोकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल डॉ. गणेश ढवळे यांचेही ग्रामस्थांनी कौतुक केले.
⬛ समाधान व्यक्त ⬛
“स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेला शब्द अखेर पूर्ण केला. ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन लिंबागणेश–बोरखेड रस्ता व नळकांडी पुलाच्या दुरुस्तीसाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. पावसाळ्यापूर्वीच काम पूर्ण झाल्याने परिसरातील नागरिकांची अनेक महिन्यांची दळणवळणाची अडचण दूर झाली. हा विजय संपूर्ण ग्रामस्थांच्या एकजुटीचा आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा आहे. यासाठी संबंधित प्रशासन आणि सर्व सहकार्य करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.”
— डॉ. गणेश ढवळे, लिंबागणेशकर
यावेळी बोलताना डॉ. गणेश ढवळे म्हणाले, “ग्रामस्थांच्या एकजुटीच्या लढ्यामुळेच हा प्रश्न मार्गी लागला. लोकहिताच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केल्यास प्रशासनालाही निर्णय घ्यावा लागतो. हा विजय संपूर्ण ग्रामस्थांचा आहे.”
👉सविस्तर ग्राउंड रिपोर्ट पाहण्यासाठी खबरनामा यूट्यूब चैनल च्या लाल बटनावर क्लिक करून सविस्तर बातमी पाहू शकता👇
खबरनामा विश्लेषण :
ही घटना लोकशाहीत संघटित जनआंदोलनाची ताकद अधोरेखित करणारी ठरली आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनतेतील समन्वय साधला गेला तर रखडलेली विकासकामेही मार्गी लागू शकतात, याचे हे एक महत्त्वाचे उदाहरण मानले जात आहे.




