अकलूजमध्ये शिक्षण प्रसारक मंडळाचा सेवाभावाचा आदर्श
पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी ३३ हजार भाकऱ्यांचे अन्नदान; १० शाखांतील १० हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

अकलूजमध्ये शिक्षण प्रसारक मंडळाचा सेवाभावाचा आदर्श
पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी ३३ हजार भाकऱ्यांचे अन्नदान; १० शाखांतील १० हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
अकलूज, प्रतिनिधी :
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज व जगद्गुरू श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वैष्णव वारकऱ्यांसाठी अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने भव्य अन्नदान उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत सुमारे ३३ हजार भाकऱ्या, १४० किलो बेसनाचे पिठले, ठेचा, लोणचे आणि कांदा अशा अस्सल ग्रामीण चवीच्या भोजनाचे प्रेमपूर्वक वाटप करण्यात आले.

या सेवाभावी उपक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाच्या १० शाखांतील तब्बल १० हजार विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी अन्न तयार करणे, नियोजन, पॅकिंग आणि वारकऱ्यांना भोजन वाटप अशी विविध जबाबदाऱ्या पार पाडत सेवाभावाचे दर्शन घडविले.

सराटी–अकलूज महामार्गावर अन्नदानाचा शुभारंभ
सराटी–अकलूज महामार्गावर आयोजित अन्नदान उपक्रमाचा शुभारंभ संस्थेचे ज्येष्ठ संचालक मा. श्री. जयसिंह मोहिते-पाटील आणि नगरसेवक मा. सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील, विविध शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेवा, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश
वारकरी संप्रदायातील सेवा हीच ईश्वरसेवा या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या अन्नदान उपक्रमाने सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाचा आदर्श निर्माण केला. हजारो वारकऱ्यांनी प्रेमाने भोजनाचा आस्वाद घेत संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक उत्तरदायित्व, सेवाभाव आणि संस्कार रुजविण्याच्या दृष्टीने शिक्षण प्रसारक मंडळाचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.
— खबरनामा न्यूज




