कोपरेतील वंचित थकबाकीदार शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करणार : आमदार प्राजक्त तनपुरे
कर्जमाफीच्या अटी शिथिल करण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही


कोपरेतील वंचित थकबाकीदार शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करणार : आमदार प्राजक्त तनपुरे
कर्जमाफीतील जाचक अटी शिथिल करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही; शेतकरी शिष्टमंडळासोबत आमदार तनपुरे यांची उपनिबंधकांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक
राहुरी : राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील कोपरे येथील अनेक वर्षांपासून कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या अल्पभूधारक व गरीब शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी पुढाकार घेतला आहे. वंचित थकबाकीदार शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आमदार तनपुरे यांनी दिली.
राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरीवर्ग, कोपरे येथील शेतकरी शिष्टमंडळ, आमदार प्राजक्त तनपुरे तसेच उपनिबंधक खेडकर साहेब यांच्या संयुक्त उपस्थितीत आमदार तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी व व्यथा आमदार तनपुरे यांच्यासमोर मांडल्या.
या प्रश्नाची गंभीर दखल घेत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सचिव भगीरथ जगताप तसेच उपनिबंधक खेडकर साहेब यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. कर्जमाफीच्या प्रक्रियेत असलेल्या जाचक अटी व शर्तींमुळे अनेक गरीब आणि अल्पभूधारक शेतकरी लाभापासून वंचित राहिल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.
“कर्जमाफीच्या जाचक अटी व शर्ती शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस निश्चितच सकारात्मक निर्णय घेतील,” असा विश्वास आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला. अनेक वर्षांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी, कर्जाचा वाढता बोजा आणि कर्जमाफीच्या प्रक्रियेतून वंचित राहिल्याने निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता शासनाने मानवी दृष्टिकोनातून या प्रकरणांचा विचार करावा, अशी अपेक्षा शेतकरी शिष्टमंडळाने व्यक्त केली.
शेतकरी शिष्टमंडळाचा सक्रिय सहभाग
या बैठकीस माजी चेअरमन भीमाजी जगताप, माजी सरपंच भगीरथ जगताप, उपसरपंच साहेबराव जगताप, सुधाकर जगताप, रामराव जगताप, निरंजन जगताप, बाजीराव जगताप, भाऊसाहेब जगताप, विश्वनाथ जगताप, निवृत्ती जगताप, बाळासाहेब घोडके, यमाजी जगताप, विठ्ठल जगताप, जैमिनी जाधव, नामदेव जगताप यांच्यासह कोपरे येथील वंचित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वर्षानुवर्षे कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला आता आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पाठपुराव्यामुळे शासनदरबारी न्याय मिळतो का, याकडे कोपरेसह राहुरी तालुक्यातील शेतकरीवर्गाचे लक्ष लागले आहे.



