सहकारातील संत : लोकनेते मारुतरावजी घुले पाटील
शेवगाव-नेवासा परिसराचे भाग्यविधाते, सहकार, शिक्षण व ग्रामीण विकासाचे शिल्पकार

सहकारातील संत : लोकनेते मारुतरावजी घुले पाटील
शेवगाव-नेवासा परिसराचे भाग्यविधाते, सहकार, शिक्षण व ग्रामीण विकासाचे शिल्पकार
अहमदनगर जिल्ह्यात विसाव्या शतकात राजकारण, समाजकारण, शिक्षण, उद्योग या क्षेत्रात जे ग्रामीण नेतृत्व उदयाला आले त्यामध्ये एकेकाळचे अहमदनगर जिल्ह्याचे नेते, शेवगाव-नेवासा तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते स्व. मारुतरावजी घुले पाटील हे अग्रभागी होते. त्यांनी या भागात हरितक्रांती घडवून आणली. समाजाला नवी दिशा दिली. अहमदनगर जिल्ह्याच्या विकासात भरीव योगदान दिले. म्हणून अहमदनगर जिल्ह्याचाच नव्हे तर महाराष्ट्राचा स्वातंत्र्योत्तर इतिहास अभ्यासायचा झाला, तर लोकनेते स्व. मारुतरावजी घुले पाटील यांचे योगदान समजून घेणे अपरिहार्य ठरते.
त्यांचा जन्म १५ सप्टेंबर १९३० रोजी झाला. उपजतच त्यांना समाजकार्याची आवड होती. श्रीरामपूर येथे शिक्षण घेत असताना शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केली. वसतिगृहात राहणाऱ्या मुलांसाठी ते मित्रांच्या सहाय्याने धान्याची व पैशाची मदत गोळा करत. तो काळ पारतंत्र्याचा होता. स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे नेतृत्व करत स्वातंत्र्यलढा समजावून घेतला. प्रभात फेरीसारख्या उपक्रमात भाग घेतला.
त्यांनी दहिगावच्या पाटीलकीची सूत्रे हाती घेतली तेव्हा हैदराबाद सरकारच्या सीमेवरून रझाकारांचा शेतकऱ्यांना मोठा त्रास होत होता. तो त्रास कमी करण्यासाठी त्यांनी गावातील युवकांना एकत्र करून ग्रामसुरक्षा दलाची स्थापना केली आणि रझाकारांचा मुकाबला केला.
तो काळ सावकारशाहीचा होता. गोरगरीब जनता सावकारी कर्जाच्या विळख्यात सापडलेली होती. अनेकांच्या जमिनी सावकार कवडीमोलाने गिळंकृत करत होते. अशा परिस्थितीत त्यांनी जिल्हा सहकारी बँकेची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील सहकाऱ्यांच्या साह्याने अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची स्थापना केली. बँकेमार्फत कर्जपुरवठा सुलभ व्हावा म्हणून गावोगाव सहकारी सोसायट्या स्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले.
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य किंमत मिळावी व शेतकऱ्यांना योग्य किमतीत खते व अवजारे उपलब्ध व्हावीत म्हणून शेवगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी-विक्री संघ या संस्था दीर्घकाळ चालविल्या. कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून शेवगाव येथे जिनिंग प्रेसिंग मिलची स्थापना केली.
लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्यावर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांचा प्रभाव होता. खेड्यापाड्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांचे चाललेले शैक्षणिक कार्य पाहून ते प्रभावित झाले होते. आपल्याही परिसरातील शेतकरी, कष्टकरी, दलित समाजातील मुले-मुली शिकली पाहिजेत या हेतूने त्यांनी १९५९ साली दहिगाव-ने येथे जनता शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून नवजीवन विद्यालय सुरू केले. वसतिगृह सुरू करून परिसरातील गोरगरीब मुलांची राहण्याची व जेवणाची मोफत सोय केली आणि परिसरात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.
१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राची सूत्रे हातात घेतली आणि महाराष्ट्र प्रगतिपथावर नेण्यासाठी अनेक अनुयायी तयार केले. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातून लोकनेते मारुतरावजी घुले पाटील अग्रभागी होते. त्यांनी १० वर्षे अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळले. जिल्ह्यात काँग्रेस मजबूत केली. त्यांचे संघटन कौशल्य पाहून यशवंतराव चव्हाण यांनी १९६२ साली शेवगाव-नेवासा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली. ते प्रचंड मतांनी निवडून आले. १९६७ सालीही ते विधानसभेत निवडून गेले. विधानसभेत त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले. शिक्षण सक्तीचे केले पाहिजे, असा आग्रह धरला. १९६५ साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या भव्य शिबिराचे नियोजन व संयोजन त्यांनी अत्यंत कुशलतेने केले.
सदैव शेतकऱ्यांची काळजी करणारे लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्यावर जायकवाडी धरण निर्मितीमुळे मोठा आघात झाला. शेवगाव-नेवासा भागातील हजारो एकर काळीकसदार जमीन पाण्याखाली गेली. त्या कठीण परिस्थितीत त्यांनी विस्थापितांना सावरले. त्यांना भक्कम आधार दिला.
धरणग्रस्तांचे पुनर्वसन व कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी मिळाली पाहिजे, धरणग्रस्तांसाठी जायकवाडी धरणाचे ३ टीएमसी पाणी राखीव असा कायदा विधानसभेत मंजूर करून घेतला. गोदाकाठच्या शेतकऱ्यांना जायकवाडी बॅकवॉटरचा लाभ मिळावा म्हणून वैयक्तिक पाईपलाईन, लिफ्ट योजना, वीजजोडणी यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. सहकारी बँकेमार्फत आर्थिक पुरवठा केला. त्यामुळेच आज गोदाकाठ समृद्ध झालेला दिसतो.
जायकवाडी प्रकल्पग्रस्तांच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून शेवगाव येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरू केली. तर शेवगाव-नेवासा भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून नेवासा येथे ज्ञानेश्वर महाविद्यालय, भेंडा येथे जिजामाता महाविद्यालय, कृषी तंत्र विद्यालय, वसतिगृह, आयटीआय तसेच खेड्यापाड्यात माध्यमिक विद्यालये स्थापन करून शिक्षणाचा प्रसार केला.
मुळा धरणाचे पाणी शेवगाव-नेवासा भागातील शेवटच्या घटकापर्यंत मिळावे यासाठी त्यांनी संघर्ष केला. या पाण्यामुळे शेतीचे उत्पन्न वाढले. उसासारखे नगदी पीक शेतकरी घेऊ लागला. परंतु खासगी साखर कारखाने मनमानी करू लागले. शेतकऱ्यांना ऊस बांधावर तोडून टाकण्याची वेळ आली तेव्हा लोकनेते मारुतरावजी घुले पाटील व्यथित झाले.
शेवगाव-नेवासा परिसरात शेतकऱ्यांच्या मालकीचा साखर कारखाना उभा राहिला पाहिजे असा त्यांनी निश्चय केला. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील आणि अण्णासाहेब शिंदे यांच्या सहकार्याने अथक परिश्रम घेत १९७३ साली केंद्र शासनाकडून परवानगी मिळवली आणि भेंडा येथे ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली.
१२५० मे.टन प्रतिदिन गाळप क्षमतेचा हा साखर कारखाना १९७५ पासून सुरू झाला आणि संपूर्ण परिसराचा चेहरामोहरा बदलला. या भागात वीज मिळाली पाहिजे म्हणून त्यांनी खूप कष्ट घेतले. दूरध्वनी सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. नेवासा येथील ज्ञानेश्वर मंदिरासमोर पहिल्या वीज पोलाची पूजा करण्यात आली, तर नगर येथून लाकडी पोल टाकून दूरध्वनी सेवा सुरू करण्यात आली.
१९७२ साली त्यांची विधानपरिषदेवर निवड झाली. विधानपरिषदेतही त्यांनी शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न प्रभावीपणे मांडले.
शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त भाव मिळावा म्हणून त्यांनी अल्कोहोल निर्मिती प्रकल्प उभारला; परंतु अल्कोहोलपासून दारू निर्मिती कटाक्षाने टाळली. समाजहित आणि नैतिक मूल्यांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले.
सहकारातील संत : लोकनेते मारुतरावजी घुले पाटील
शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त भाव मिळावा म्हणून त्यांनी अल्कोहोल निर्मिती प्रकल्प उभारला; परंतु अल्कोहोलपासून दारू निर्मिती कटाक्षाने टाळली. सहकार चळवळीचा मूलभूत उद्देश शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण हा असल्याने त्याला तडा जाऊ नये, यासाठी त्यांनी नेहमीच तत्त्वनिष्ठ भूमिका घेतली.
१२५० मे.टन प्रतिदिनी गाळप क्षमता असणाऱ्या ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे त्यांनी सन २००१ पर्यंत ५००० मे.टन प्रतिदिनी विस्तारीकरण केले. सभासद आणि बिगर सभासद असा कोणताही भेदभाव न करता सर्व शेतकऱ्यांना समान भाव दिला. कामगारांना स्वतःची घरे बांधण्यासाठी कारखान्याच्या मालकीची जागा उपलब्ध करून दिली तसेच आर्थिक मदतही केली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रातील अग्रगण्य कारखान्यांपैकी एक म्हणून नावलौकिकास आला.
त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली. सन १९९५ मध्ये ‘इंदिरा गांधी प्रियदर्शनी पुरस्कार’, १९९६ मध्ये ‘भारतीय उद्योगरत्न पुरस्कार’ आणि १९९७ मध्ये ‘सहकार भूषण पुरस्कार’ या मानाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यालाही उत्कृष्ट कार्यक्षमतेबद्दल अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. सन २००० मध्ये कारखान्याला आय.एस.ओ. प्रमाणपत्र प्राप्त झाले.
त्यांच्या पुरोगामी विचारसरणीचा प्रत्यय वेळोवेळी आला. महिला व मागासवर्गीयांना राजकीय आरक्षण नसतानाही त्यांनी आपल्या दहिगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपद मागासवर्गीय महिलेला, तर शेवगाव पंचायत समितीचे सभापतीपद मागासवर्गीय उमेदवारास बहाल केले. सामाजिक समतेचा विचार त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून समाजासमोर ठेवला.
१९९५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वतःच्या मुलाची उमेदवारी रद्द करून अल्पसंख्याक समाजातील मा. पांडूरंग अभंग यांना उमेदवारी देत विधानसभेवर निवडून आणले. शिक्षण संस्था आणि साखर कारखान्यात अनेक शेतकरी, दलित आणि गरजू युवकांना रोजगार दिला. अनेक गोरगरीब कुटुंबांचे संसार उभे केले.
त्यांचा स्वभाव अत्यंत शांत, संयमी आणि माणुसकीने ओतप्रोत भरलेला होता. समोरच्या व्यक्तीची समस्या समजून घेऊन ती सोडविण्याचा ते प्रामाणिक प्रयत्न करत. दुष्काळाच्या काळात त्यांनी गावकऱ्यांना आणि अठरापगड जातीतील गरजू लोकांना स्वतःच्या घरातील धान्य मोफत वाटप केले. गोरगरीबांच्या घरातील लग्नकार्य, आजारपण किंवा अन्य अडचणीच्या प्रसंगी त्यांनी सढळ हाताने मदत केली. त्यामुळे परिसरातील जनतेला ते घरातीलच कर्ता पुरुष वाटत असत. एवढा दृढ विश्वास त्यांनी आपल्या कार्यातून निर्माण केला होता.
शेवगाव-नेवासा भागाला शेती, शिक्षण, वीज, पाणी आणि उद्योग या सर्व क्षेत्रांत स्वयंपूर्ण करण्याचे कार्य त्यांनी केले. रचनात्मक ग्रामीण विकासाचा मजबूत पाया त्यांनी घातला. त्यामुळेच या परिसराचे ते खऱ्या अर्थाने ‘विकासाचे शिल्पकार’ ठरले.
समाजकार्यात सक्रिय असतानाच ८ जुलै २००२ रोजी त्यांचे निधन झाले. मात्र त्यांनी दिलेला विचार, उभारलेल्या संस्था आणि केलेली विकासकामे आजही चिरंतन प्रेरणा देत आहेत.
सहकारातील संत : लोकनेते मारुतरावजी घुले पाटील
लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांनी शेवगाव-नेवासा भागात विकासाची जी पायाभरणी केली, ती आजही जनतेसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या कार्याचा वारसा त्यांच्या कुटुंबीयांनी समर्थपणे पुढे चालविला आहे.
त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव मा. आ. डॉ. नरेंद्र घुले पाटील यांनी शेवगाव-नेवासा मतदारसंघाचे दोन वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले असून, आपल्या कर्तृत्वाने व विकासाभिमुख कार्याने लोकनेत्यांच्या कार्यावर कळस चढविला आहे.
तर शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात त्यांचे दुसरे चिरंजीव मा. आ. चंद्रशेखर घुले पाटील यांनी आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत मतदारसंघासाठी सर्वाधिक विकासनिधी आणून अल्पावधीतच विकासकामांचा ठसा जनतेच्या मनावर उमटविला.
नातू डॉ. क्षितिज घुले पाटील यांनी शेवगाव पंचायत समितीचे सभापती म्हणून काम करताना विकासाभिमुख भूमिका घेतली. तसेच स्नुषा राजश्रीताई घुले पाटील यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून कार्य करताना तालुका व जिल्ह्यात अनेक नेत्रदीपक विकासकामे राबविली.
कर्तृत्वसंपन्न, सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न, जिद्दी आणि लढवय्ये असे घुले पाटील कुटुंब आजही लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांची नवनिर्मितीची अधुरी स्वप्ने साकार करण्यासाठी कार्यरत आहे. सहकार, शिक्षण, शेती, उद्योग आणि सामाजिक बांधिलकी यांचा त्यांनी दिलेला वारसा आजही त्याच निष्ठेने पुढे नेला जात आहे. हेच या परिसरातील जनतेचे मोठे भाग्य आहे.
लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सत्ता ही समाजसेवेचे माध्यम मानली. सहकाराला लोकचळवळीचे स्वरूप दिले. शिक्षणाचा प्रसार केला. शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. धरणग्रस्तांना आधार दिला. ग्रामीण भागात उद्योग उभे केले. हजारो युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला. सामाजिक समतेचा विचार प्रत्यक्ष कृतीतून रुजविला. त्यामुळेच त्यांना “सहकारातील संत”, “विकासाचे शिल्पकार” आणि “शेवगाव-नेवासा परिसराचे भाग्यविधाते” म्हणून आजही आदराने स्मरण केले जाते.
८ जुलै हा त्यांचा पुण्यस्मरण दिन केवळ एका महान नेत्याच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा दिवस नसून, समाजकारण, सहकार, शिक्षण आणि लोककल्याणासाठी समर्पित जीवनाचा आदर्श पुन्हा एकदा स्मरण करण्याचा दिवस आहे.
लोकनेते स्व. मारुतरावजी घुले पाटील यांना पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन! 🌹🙏
शब्दांकन : भाऊसाहेब सावंत
संकलन : बाळासाहेब आरगडे




