प्रभाग क्रमांक २ मधील सर्वसाधारण गटाची लढत शहरभर चर्चेचा विषय!
राजगौरव वानखेडे की शहरविकासाचे अभ्यासक राजेंद्र दाते पाटील?

प्रभाग क्रमांक २ मधील सर्वसाधारण गटाची लढत शहरभर चर्चेचा विषय!
राजगौरव वानखेडे की शहरविकासाचे अभ्यासक राजेंद्र दाते पाटील?
खबरनामा न्यूज | आमचे विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप–शिवसेना युतीत जागावाटपाबाबत हालचालींना वेग आला आहे. विविध बैठका पार पडत असून, प्रत्येक प्रभागातील संघटनात्मक ताकद, जिंकण्याची क्षमता आणि स्थानिक समीकरणांचा सखोल अभ्यास करूनच उमेदवार निश्चित केले जाणार असल्याचे संकेत आहेत.
या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ मधील सर्वसाधारण गटाची लढत सध्या शहरभर चर्चेचा विषय ठरली आहे.
“राजगौरव वानखेडे की राजेंद्र दाते पाटील?” हा प्रश्न आता राजकीय वर्तुळातच नव्हे, तर सामान्य नागरिकांमध्येही चर्चिला जात आहे.
आमच्या प्रतिनिधींनी प्रभाग क्रमांक २ मध्ये (एन-११, एन-१२, एन-१३, रोजेबाग, महेमूदपुरा परिसर) केलेल्या पाहणीत नागरिकांकडून स्पष्ट प्रतिक्रिया समोर आली. मुस्लिम, मागासवर्गीय व मराठा बहुसंख्य असलेल्या या प्रभागात शहरविकासाचे ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील हे सहज आघाडी घेऊ शकतात, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
सध्या या प्रभागात तीन नगरसेवक असून, त्यात भाजपचे दोन आणि शिवसेनेचा एक नगरसेवक आहे. मात्र,
अद्याप नियमित व पुरेसा पाणीपुरवठा नाही,
गुंठेवारीचे प्रश्न प्रलंबित आहेत,
सांडपाणी व्यवस्थापन कोलमडलेले आहे,
निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे नागरिक हैराण आहेत.
याशिवाय, गोरगरीब व मध्यमवर्गीय बहुल भागात टपोरी व टोळक्यांची दहशत वाढली असून मारहाण, वस्तू हिसकावणे यासारख्या घटना घडत आहेत. भीतीपोटी नागरिक तक्रार करण्यासही धजावत नाहीत, अशी खंत अनेकांनी व्यक्त केली. त्यामुळेच यावेळी “बदल हवा आहे” ही भावना प्रबळ होताना दिसत आहे.
हर्सूल तलावाचे पाणी सिडको–हडको भागाला देण्याचा निर्णय रोखण्यात आलेला, शहर बससेवा कोलमडलेली, तसेच सिडको–हडको वसाहतींचा फ्री-होल्ड मालकी हक्काचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याने त्याचा रोषही या प्रभागात जाणवतो.
या सर्व पार्श्वभूमीवर, जर राजेंद्र दाते पाटील हे सर्वसाधारण गटातून उमेदवार म्हणून पुढे आले, तर सत्ताधारी उमेदवारांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र भेट होऊ शकली नाही.
राजेंद्र दाते पाटील हे संयमी, पण लढाऊ वृत्तीचे नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
त्यांचे उल्लेखनीय लढे पुढीलप्रमाणे आहेत —
पाणीपुरवठ्यासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयातील यशस्वी जनहित याचिका
गुंठेवारी प्रश्नावर दीर्घकालीन संघर्ष
सिमेंट रस्ते, भूमिगत गटार योजना
सिडको–हडको वसाहतींचा फ्री-होल्ड मालकी हक्क
स्मार्ट सिटी लोकाभिमुख करण्यासाठीचा लढा
क्रांती चौकातील काळा चबुतरा प्रश्न
घनकचरा व्यवस्थापन
आरक्षण व राज्यघटना बचाव अभियान
मुस्लिम आरक्षण छावणी परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंगल्याला राष्ट्रीय स्मारकाचा लढा
वर्षानुवर्षांच्या या प्रामाणिक संघर्षामुळे त्यांना सर्व समाजघटकांत मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यामुळे अनेक राजकीय पक्ष त्यांना उमेदवार करण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे.
ही लढत प्रत्यक्षात उतरली, तर ती केवळ निवडणूक न राहता “शहराच्या विकासाची लढत” ठरेल, आणि नागरिकांच्या न्याय्य अपेक्षांना दिशा देणारी ठरेल, अशी लोकभावना सध्या प्रभाग क्रमांक २ मध्ये ठळकपणे व्यक्त होत आहे.
— खबरनामा न्यूज




