Breaking
ई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालगुणवंतांचा सत्कारपंढरपूरपंढरपूर स्वच्छता अभियानपुरस्कारब्रेकिंगमहाराष्ट्रवकृत्व स्पर्धाविशेष निवडशिबिरश्री क्षेत्र पंढरपूरसांस्कृतिक कार्यक्रमस्वेरी अभियांत्रिकी कॉलेजच्या

योग्य वेळी केलेल्या सत्कारामुळे शिक्षकांना स्फूर्ती मिळते : आमदार समाधान आवताडे

स्वेरीत पंढरपूर व माळशिरस तालुक्यांसाठी ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’ उत्साहात संपन्न

0 7 1 3 6 3

योग्य वेळी केलेल्या सत्कारामुळे शिक्षकांना स्फूर्ती मिळते : आमदार समाधान आवताडे

स्वेरीत पंढरपूर व माळशिरस तालुक्यांसाठी ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’ उत्साहात संपन्न

 

पंढरपूर | दि. २६ ऑगस्ट २०२६

 

पंढरपूर : “समाजात काम करताना चांगल्या माणसांच्या पाठीवर नेहमी कौतुकाची थाप पडली पाहिजे. योग्य वेळी केलेला सत्कार शिक्षकांना अधिक चांगले काम करण्यासाठी स्फूर्ती देतो. डॉ. बी. पी. रोंगे सरांनी गोपाळपूरच्या माळरानावर शून्यातून विश्व उभे केले आहे, हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. स्वेरीने विविध क्षेत्रांत विशेष संशोधन यशस्वीपणे केले आहे आणि आजही सुरू आहे. एकूणच या कार्यामागे डॉ. रोंगे सरांचा बारीक अभ्यास दिसून येतो,” असे प्रतिपादन पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी केले.

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट आणि खेड (ता. उत्तर सोलापूर) येथील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एस.व्ही.आय.टी.) यांच्या वतीने पंढरपूर व माळशिरस तालुक्यांतील शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांसाठी स्वेरी येथे ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार वितरण सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून आमदार समाधान आवताडे बोलत होते.

दीपप्रज्वलनानंतर श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य तसेच खेड (ता. उत्तर सोलापूर) येथील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष डॉ. बी. पी. रोंगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यांनी स्वेरीच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेत कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला.

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी अभ्यासपूर्ण पाठपुरावा करणार : डॉ. बी. पी. रोंगे

“शिक्षकांचे प्रश्न, अडचणी आणि समस्या शासन पातळीवर अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ‘कम्फर्ट झोन’च्या बाहेर जाऊन काम करावे लागेल,” असे डॉ. रोंगे यांनी सांगितले.

आजच्या शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिक्षक म्हणून मानसन्मान मिळत असला तरी अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा ही गंभीर बाब असून तो कमी करण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच टीईटीसह शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर आणि प्रलंबित मागण्यांवर त्यांनी अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला.

पुरस्कारामुळे वैचारिक उंची वाढते : आमदार अभिजित पाटील

कार्यक्रमाचे उद्घाटक माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी मार्गदर्शन करताना पुरस्काराच्या महत्त्वावर भाष्य केले.

“पुरस्काराने माणसे मोठी होतात आणि त्यांची वैचारिक उंची वाढते. भविष्यात आदर्श विद्यार्थी, आदर्श संस्था, आदर्श शाळा, महाविद्यालय, आदर्श क्रीडा शिक्षक आणि आदर्श शिक्षक निवडण्याचे ज्ञान अशा उपक्रमातून प्राप्त होते. देशाला महासत्ता बनवत असताना आपण आपल्या विचारांवर ठाम राहिले पाहिजे. आपण शिक्षक असल्यामुळे चांगले आणि वाईट यातील फरकाचे ज्ञान असते,” असे आमदार अभिजित पाटील म्हणाले.

डॉ. रोंगे सरांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकीच्या दालनातून मोठे विश्व उभे केले आहे. स्वेरीची गुणवत्ता येथील संस्कार आणि शिस्तीमुळे टिकून आहे. त्यामुळे शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी आपण डॉ. रोंगे सरांच्या सोबत राहू, अशी ग्वाहीही आमदार पाटील यांनी दिली.

 

शिक्षकांच्या कार्याची दखल घेणे महत्त्वाचे : सुभाषराव माने

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबईचे अध्यक्ष सुभाषराव माने म्हणाले, “ब्रह्मा, विष्णूपेक्षाही श्रेष्ठ असणाऱ्या गुरुजनांचा ‘ज्ञानयात्री पुरस्कार’ देऊन येथे सन्मान होत आहे, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. गुरूंनी प्रामाणिकपणे केलेल्या कार्याची दखल घेताना डॉ. बी. पी. रोंगे सरांनी पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन कामगिरी आणि ताकद वाढविण्याचे काम केले आहे.”

अनेक शिक्षक पुरस्कारासाठी पात्र असूनही त्यांना पुरस्कारापासून वंचित राहावे लागते. अशा शिक्षकांची निवड करून त्यांचा सन्मान करण्याचे काम डॉ. रोंगे यांनी केले असल्याचे माने यांनी नमूद केले.

यावेळी माने यांनी डॉ. रोंगे यांच्या कार्याचे कौतुक करत, “डॉ. रोंगे सर तुम्ही आमदार झालात असे समजा. या जिल्ह्यातील सर्व शाळांतील शिक्षक आपल्या पाठीशी असतील. कारण तुम्ही शून्यातून जग निर्माण केले आहे. चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी जनता असते. त्यामुळे डॉ. बी. पी. रोंगे सर शिक्षक आमदार होण्यासाठी पात्र आहेत आणि ते लवकरच आमदाराच्या खुर्चीवर स्वार होतील,” अशी अपेक्षा व्यक्त केली.

‘आपल्या हक्काचा माणूस विधानसभेवर पाठवा’ : प्रकाश पाटील

 

श्रीराम शिक्षण संस्था, पानीवचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनीही डॉ. रोंगे यांच्या कार्याचे कौतुक केले.

 

“या व्यासपीठावर दोन आमदार अगोदरच आहेत. आता तिसरा आमदारही याच ठिकाणाहून यावा, अशी सर्वांची इच्छा आहे. आपल्या हक्काचा, जवळचा आणि अभ्यासू माणूस असलेल्या डॉ. रोंगे सरांना विधानसभेवर आमदार म्हणून पाठवा. आपल्या हक्काचा माणूस असल्यामुळे डॉ. रोंगे सर शिक्षकांच्या समस्या अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडू शकतात,” असे प्रकाश पाटील यांनी सांगितले.

 

प्राचार्य उत्तरेश्वर मुंढे यांनीही डॉ. रोंगे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला.

सुमारे २१० जणांचा आदर्श पुरस्काराने गौरव

या सोहळ्यात जवळपास २१० जणांना आदर्श संस्थापक, आदर्श प्राचार्य, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक, आदर्श क्रीडा शिक्षक अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

पुरस्कारार्थींना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, विठ्ठलाची प्रतिमा, शाल आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला पंढरपूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष कवडे, राजाराम शिक्षण संकुलच्या रजनी जाधव, भारूडकार चंदाताई तिवाडी, श्रीमती ज्योतीताई कुलकर्णी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पंढरपूर व माळशिरस तालुक्यांतील विविध शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, क्रीडा शिक्षक आदींसह जवळपास १२०० जणांची उपस्थिती होती.

प्रा. यादव पनसवाड व प्रा. तांबोळी यांनी सूत्रसंचालन केले तसेच उपस्थितांचे आभार मानले.

 

फेटे परिधान करून पुरस्कारार्थींचा जल्लोष

पुरस्कार सोहळ्यानंतर संपूर्ण स्वेरी कॅम्पसमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पुरस्कारार्थींनी फेटे परिधान करून पुरस्कारांसह छायाचित्रे काढली. त्यामुळे संपूर्ण स्वेरी परिसरात पुरस्कार सोहळ्याचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

— खबरनामा न्यूज

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 1 3 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे