रोडरोमिओंनो सावधान! डिजिटल कॅमेऱ्यांची नजर अन् दराडे साहेबांचा दणका!
मुलींच्या सुरक्षेसाठी नेवासा तालुक्यात विशेष अभियान; डिजिटल पुराव्यांच्या आधारे कारवाईचा इशारा


रोडरोमिओंनो सावधान! डिजिटल कॅमेऱ्यांची नजर अन् दराडे साहेबांचा दणका!
मुलींच्या सुरक्षेसाठी नेवासा तालुक्यात विशेष अभियान; डिजिटल पुराव्यांच्या आधारे कारवाईचा इशारा
नेवासा | प्रतिनिधी
शाळा आणि महाविद्यालयीन परिसरात मुलींना त्रास देणाऱ्या रोडरोमिओ व गुंड प्रवृत्तीच्या युवकांना चाप लावण्यासाठी नेवासा तालुक्यात कर्तव्यदक्ष अधिकारी प्रताप दराडे साहेब यांनी विशेष अभियान हाती घेतले आहे. या अभियानामुळे शैक्षणिक संस्थांच्या परिसरात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने हाताळला जात असून, गैरप्रकार करणाऱ्या युवकांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे.
शाळा, महाविद्यालये आणि विद्यार्थिनींची वर्दळ असलेल्या महत्त्वाच्या ठिकाणी डिजिटल सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन दराडे साहेब यांनी संस्थाचालकांना केले आहे. एखाद्या विद्यार्थिनीला त्रास देणे, पाठलाग करणे किंवा अन्य गैरप्रकार करण्याचा प्रयत्न झाल्यास, सीसीटीव्हीच्या डिजिटल पुराव्यांच्या आधारे संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
“मुलींना त्रास देऊ नका; त्यांचा सन्मान करा!”
युवकांना आवाहन करताना दराडे साहेब यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. प्रत्येक मुलीला सुरक्षित वातावरणात शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. युवकांकडून मुलींना त्रास देण्याऐवजी त्यांचे संरक्षण, सन्मान आणि सुरक्षितता राखण्याची अपेक्षा समाजाची आहे. मात्र, कोणी जाणूनबुजून विद्यार्थिनींना त्रास देत असेल तर अशा प्रवृत्तीला कोणतीही माफी दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या अभियानातून देण्यात आला आहे.
पीडित युवतींनी पुढे यावे; ओळख पूर्णपणे गोपनीय संपर्क नंबर+91 73855 53120
विशेष म्हणजे, एखाद्या मुलीला शाळा किंवा महाविद्यालयात अथवा ये-जा करताना त्रास होत असल्यास तिने भीती न बाळगता दराडे साहेबांशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पीडित युवतीचे नाव किंवा ओळख सार्वजनिक केली जाणार नाही, गोपनीयता राखून संबंधित त्रास देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध आवश्यक ती कारवाई केली जाईल, असा विश्वास त्यांनी दिला आहे.
मुलींचे शिक्षण थांबू नये!
सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी केलेल्या संघर्षामुळे मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली झाली. आजच्या काळात एखाद्या रोडरोमिओच्या किंवा गुंड प्रवृत्तीच्या युवकाच्या त्रासामुळे एखाद्या मुलीने शिक्षण अर्धवट सोडावे, हे समाजासाठी दुर्दैवी आहे.
काही वेळा मुलींच्या सुरक्षेबाबत पालकांच्या मनात निर्माण होणाऱ्या भीतीमुळे त्यांचे शिक्षण थांबविले जाते. अशा गैरप्रवृत्तींमुळे मुलींचा शिक्षणाचा हक्क हिरावला जाऊ नये, यासाठी दराडे साहेबांनी घेतलेली भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
संस्थाचालकांनीही सहकार्य करावे
शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत व उपलब्ध डिजिटल फुटेज सुरक्षित ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला संस्थाचालकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, अनेक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत.
“पालकांनी काळजी करू नये, आम्ही तुमच्या सोबत आहोत!”
मुलींच्या पालकांनी घाबरून जाऊ नये. आपल्या मुलीला कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा. मुलींच्या सुरक्षिततेसाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा विश्वास दराडे साहेबांनी खबरनामा न्यूजशी बोलताना व्यक्त केला.
रोडरोमिओंवर केवळ तोंडी इशारा न देता डिजिटल पुरावे, सीसीटीव्ही आणि कायदेशीर कारवाईच्या माध्यमातून लगाम घालण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पालक वर्गातून दराडे साहेबांचे कौतुक होत आहे.
मुलींच्या शिक्षणाला अडथळा आणणाऱ्या प्रवृत्तींविरोधात कठोर भूमिका आणि विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण देण्याचा हा प्रयत्न निश्चितच स्वागतार्ह आहे.




