क्रांतिकारी निर्णयातून ‘आप’च्या शालिनी सुखधान उपनगराध्यक्ष
माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा लोकशाहीचा आदर्श निर्णय राजेंद्र काळे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड


क्रांतिकारी निर्णयातून ‘आप’च्या शालिनी सुखधान उपनगराध्यक्ष
माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा लोकशाहीचा आदर्श निर्णय
राजेंद्र काळे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड
नेवासा (प्रतिनिधी) –
नेवासा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक बुधवारी (दि. १४ जानेवारी) पार पडली. या निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्ष व आम आदमी पक्षाच्या संयुक्त पाठिंब्यावर सौ. शालिनी संजय सुखधान यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली, तर राजेंद्र कारभारी काळे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली.
नेवासा नगरपंचायतीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील गटाचे स्पष्ट बहुमत असून या गटाचे १० नगरसेवक आहेत. विरोधी गटाकडे अपक्षांसह ७ नगरसेवक आहेत.
उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत सौ. शालिनी सुखधान व विरोधी उमेदवार प्रवीण सरोदे यांच्यात थेट लढत झाली. हात उंचावून मतदान या पद्धतीने झालेल्या निवडणुकीत सौ. शालिनी सुखधान यांना १० मते, तर प्रवीण सरोदे यांना ८ मते मिळाली.

क्रांतिकारी पक्षाचा आदर्श निर्णय
क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे ९ नगरसेवक असतानाही, पक्षाने आम आदमी पक्षाच्या नगरसेविका शालिनी सुखधान यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी देत लोकशाही मूल्यांचा आदर्श घालून दिला. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
निवडणूक प्रक्रियेला साक्षीदार
यावेळी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे गटनेते जितेंद्र कु-हे, नगरसेवक संभाजी धोत्रे, स्वप्नील मापारी, नगरसेविका जयश्री शिंदे, नसरीन शेख, सोनल चव्हाण, शहिदाबी पठाण, शोभा व्यव्हारे, प्रतिभा गवळी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सत्कार व जल्लोष
निवड जाहीर होताच गुलालाची उधळण करण्यात आली.
नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सौ. शालिनी सुखधान व स्वीकृत नगरसेवक राजेंद्र काळे यांचा सत्कार अर्थ व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती सुनीलराव गडाख, रावसाहेब कांगुणे, नंदकुमार पाटील, नानभाऊ नवथर, दादासाहेब शेळके, राजेंद्र गुगळे, आपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आघाव, माजी नगराध्यक्ष सतीश पिंपळे, डॉ. शिवाजीराव शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
नेवासा शहर व तालुक्यातील शंकरराव गडाख मित्रमंडळाचे कार्यकर्ते व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔲
सत्तेचा गैरवापर हाणून पाडला – संजय सुखधान
नगरपंचायत अधिनियमानुसार हात उंचावून मतदान करणे बंधनकारक असताना, सत्तेचा गैरवापर करून वेगळी प्रक्रिया लादण्याचा प्रयत्न झाला. अधिकाऱ्यांच्या मदतीने हा डाव रचण्यात आला होता. मात्र आम्ही थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत दाद मागितली.
जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हाला न्याय दिला.
माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी दिलेला शब्द पाळून सामान्य कुटुंबातील महिलेला उपनगराध्यक्ष केले. आता नेवासा शहराच्या सर्वसामान्य जनतेसाठी प्रामाणिकपणे काम केले जाईल, असे आपचे नेते संजय सुखधान यांनी सांगितले.
उपनगराध्यक्ष निवडीत लोकशाहीची पायमल्ली; अखेर कायदेशीर लढ्यात विजय
नेवासा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक दुपारी १.४५ वाजता होणे अपेक्षित असताना, पिठासीन अधिकारी असलेल्या नगराध्यक्षांनी ती जाणीवपूर्वक सायंकाळी ४ वाजेपर्यंत लांबवली, असा गंभीर आरोप करण्यात आला.
नियमबाह्य हस्तक्षेपामुळे अखेर जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्याकडे दाद मागावी लागली.
सर्व अडथळ्यांवर मात करत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली सौ. शालिनी संजय सुखधान यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली.
एका सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला उपनगराध्यक्षपदाची संधी मिळणे हे सामाजिक व राजकीय परिवर्तनाचे प्रतीक असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना सौ. शालिनी संजय सुखधान म्हणाल्या,
“माजी मंत्री शंकररावजी गडाख यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या या संधीचा उपयोग नेवासा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निष्ठेने करणार आहे.”

📸 फोटो
नेवासा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी निवडीबद्दल सौ. शालिनी संजय सुखधान व स्वीकृत नगरसेवकपदी निवडीबद्दल राजेंद्र काळे यांचा सत्कार करताना माजी सभापती सुनीलराव गडाख व अन्य मान्यवर.




